Jalna News : आंतरधर्मीय विवाह केला म्हणून कुटुंबियांनी मुलीला आणि नातवाला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

जालना : जालन्यामधून एक ढक्कादायक घटना समोर आली आहे.यामध्ये एका तरुणीने आंतरधर्मीय लग्न केल्याने तिच्या माहेरच्या लोकांनी क्रूरतेचा कळस गाठत तिला भयंकर शिक्षा दिली आहे.जालना जिल्ह्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय दिली शिक्षा?
पीडित महिला लग्नानंतर पाच वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला माहेरी आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासह त्याच्या लहान बाळाला साखळदंडांनी बांधून ठेवलं. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने दोघांना डांबून ठेवण्यात आलं होतं. शहनाज उर्फ सोनल असं पीडित महिलेचं नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहनाजने पाच वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. हे लग्न शहनाजच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यांनी सुरुवातीपासून या लग्नाला विरोध केला. पण मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन संबंधित मुलासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली होती. या दाम्पत्याला एक मुलगाही झाला.
काही दिवसांपूर्वीच शहनाज आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आपल्या माहेरी आली होती. पण आपल्या मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग तिच्या कुटुंबियांच्या मनात होता. याच रागातून तिच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला 2 महिने डांबून ठेवलं. दोघांच्याही हाता-पायाला साखळीने बांधले. या गोष्टीची माहिती महिलेच्या पतीला समजताच त्याने औरंगाबाद खंडपीठासमोर दाद मागितली.
पोलिसांनी पीडितेची केली सुटका
न्यायालयाने पीडित तरुणाची सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर भोकरदन पोलिसांना विवाहितेची सुटका करून तिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.यानंतर पोलिसांनी मुलीच्या माहेरी जाऊन विवाहिता आणि तिच्या मुलाची सुटका केलीय. तसेच सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले. तसेच भविष्यात या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन देखील पोलिसांकडून या दांपत्याला देण्यात आले.





