Aadi Mahotsav: 21व्या शतकात भारत ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर चालतोय – पीएम मोदी

नवी दिल्ली – ‘आदी महोत्सव’ विकास आणि वारशाची कल्पना अधिक जिवंत करत आहे. जो स्वत:ला दूर समजत होता, त्याला आता सरकार मुख्य प्रवाहात आणत त्याच्या दारात जात आहे. आदिवासी समाजाचे हित हा माझ्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधांचा आणि भावनांचा विषय आहे, 21व्या शतकात भारत ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर चालत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये ‘आदी महोत्सवा’चे उद्घाटन करण्यात मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडाही होते. मोदींनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमात आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपारिक कला प्रदर्शित केल्या जात आहेत. आदिवासी समाजाने निर्माण केलेला श्री अण्णा हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असेल. मोदी म्हणाले की, मी देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी समाज आणि कुटुंबासोबत अनेक आठवडे घालवले आहेत. मी तुमच्या परंपरा जवळून पाहिल्या आहेत, त्यांच्याकडून शिकलो आहे आणि त्या जगल्या आहेत. आदिवासी जीवनशैलीने मला देशाचा वारसा आणि परंपरांबद्दल खूप काही शिकवले आहे.
मोदी पुढे म्हणाले की, आज भारत आदिवासी परंपरेला आपला वारसा आणि जागतिक व्यासपीठावर अभिमान म्हणून सादर करतो. आज भारत जगाला सांगतो की जर तुम्हाला हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या आव्हानांवर उपाय हवा असेल तर आमच्या आदिवासींच्या जीवन परंपरेकडे पहा. तुम्हाला मार्ग सापडेल.
निसर्गापासून साधनसामुग्री घेऊन आपण त्याचे संवर्धन कसे करू शकतो, याची प्रेरणा आपल्या आदिवासी समाजातून मिळते. भारतातील आदिवासी समाजाने बनवलेल्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असून ती परदेशात निर्यात केली जात आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, आज विविध राज्यांमध्ये 80 लाखांहून अधिक स्वयं-सहायता गट कार्यरत आहेत, ज्यामध्ये 1.25 कोटींहून अधिक सदस्य आपले आदिवासी बांधव आणि भगिनी आहेत आणि त्यापैकी मोठ्या संख्येने आपल्या माता-भगिनी आहेत.
मोदी असेही म्हणाले की, आदिवासी तरुणांना भाषेच्या अडथळ्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, परंतु आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पर्यायही खुला करण्यात आला आहे. आता आमची आदिवासी मुले, आदिवासी तरुण त्यांच्याच भाषेत शिक्षण घेऊन पुढे जातील. जेव्हा देश शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देतो, तेव्हा प्रगतीचा मार्ग आपोआप खुला होतो.





