कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातील सुवेंदू अधिकारी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका कोलकाता हायकोर्टाने दाखल करून घेतली असून, हायकोर्टाने निवडणूक आयोगाला या मतदारसंघातील मतमोजणी आणि संबंधित सर्व रेकॉर्ड जपून ठेवण्याची सूचना जारी केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात सुवेंदू अधिकारी आणि अन्य संबंधितांवर नोटिसाही जारी करण्याची सूचना हायकोर्टाने केली आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी या आधी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती, पण नंतर मात्र त्या 1965 मतांनी पराभूत झाल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घोषित केला होता. त्यामुळे ही निवडणूक मतमोजणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.