STच्या विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू; भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक

मुंबई – एसटीच्या विलीनीकरणावरून आक्रमक होत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. तसेच हम करे सो कायदा म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही त्यांनी केली आहे. फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरूनच नाही, तर इतरही अनेक मुद्द्यांवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सरकार अधिवेशनापासून पळ काढतेय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या चर्चेला अर्थ काय, आमच्या प्रश्नांना ऊत्तरे नाहीत, सरकार बचावात्मक पवित्रा घेतेय असेही प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच आत्ता करोनाची स्थिती समजून निर्णय घेणे योग्य राहील, निवडणुका पुढे ढकलणे राजकीय विषय असेल तर त्यानुसार निर्णय झाला पाहिजे असेही दरेकर म्हणाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी होणाऱ्या मतदानावरूनही सरकारवर त्यांनी टीका केली आहे. नियम समितीत बदल करून सरकारने काम केलंय, गुप्त मतदान हा लोकशाहीचा गाभा आहे, चुकीचा पायंडा सरकार पाडतेय. मतदान आवाजी पद्धतीने कधीच होत नाही असेही ते म्हणाले आहेत. तसेच करोना आवाक्यात असेल तर फार निर्बंध घालू नये, सरकारने करोनाचा ऊपयोग आपल्या राजकीय कार्यासाठी करू नये, असा टोलाही दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.




