‘मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी आत्महत्याच दुप्पट वाढल्या’; शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल

Sharad Pawar | Narendra Modi – मोदींच्या राज्यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, पण उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याच दुप्पट वाढल्या आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (सप) अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एका सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि ते कर्जबाजारी झाले आहेत. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याऐवजी शेतकरी आत्महत्या दुप्पट झाल्या आहेत,असे ते म्हणाले.
त्यामुळे राज्यातील सरकार बदलणे आणि शेतकरी, तरुण आणि महिलांच्या हिताचे रक्षण करणारी राजवट स्थापित करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपली शक्ती वापरली नाही. तुम्हाला नोकऱ्यांअभावी तरुण अडचणीत आलेले दिसतील.
त्यामुळे आम्हाला राज्यातील सरकार बदलावे लागेल, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पार’चा नारा देऊनही त्यांना ३०० जागाही जिंकता आल्या नाहीत, याकडे पवारांनी लक्ष वेधले.





