ST employees: राज्यभरातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फेब्रुवारी महिन्याचा थकीत हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा झाला. राज्य शासनाने यासाठी तातडीने १०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केल्यामुळे हे शक्य झाले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा करून २१० कोटी रुपयांची मागणी लावून धरली. त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला असून उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा – मोठा घोटाळा! सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी हा केवळ आर्थिक दिलासा नसून शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रत्यय आहे, असे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधी उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.