पुणे जिल्हा | मोहितेवाडीत विठ्ठल-रुक्मिणी, गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – मोहितेवाडी (ता. खेड) येथील हनुमान मंदिरात स्व. डॉ. सुलभा शिवाजीराव मोहिते यांच्या स्मृतीपित्यर्थ स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून लोकदैवत विठ्ठल-रुक्मिणी व गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली.
विठ्ठल-रुक्मिणी व गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना महायज्ञ करण्यात आला. त्यानंतर शांतीब्रह्म मारुतीबुवा महाराज कुरेकर व डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी व गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, उमेश महाराज बागडे, सरपंच शरदराव मोहिते, डॉ. शैलेश मोहिते आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, 100 पेक्षा अधिक महिला व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणी व गणेश मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात मोहितेवाडी ते कानिफनाथ मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. कानिफनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत आणण्यात आली.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, भवानी माता भजनी मंडळ सांगवी यांचे संगीत भजन व हरिपाठ घेण्यात आला. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे हरीकीर्तन झाले. महाप्रसाद व हरीजागराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहितेवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.





