एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात उद्योजकतेवर प्रेरणादायी कार्यशाळा

पुणे : आजच्या युगात रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना तरुणांनी उद्योजकतेकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत करण्यात आले. “उद्योजकतेचा प्रवास समजून घेणे” या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ही कार्यशाळा महाविद्यालयात सुरू झालेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना आणि यशस्वी अंमलबजावणीचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. भरत व्हनकटे यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी स्वतंत्र मंच उपलब्ध होत असून नवउद्योजक संस्कृतीला चालना मिळत आहे.
कार्यशाळेत दोन नामवंत उद्योजकांनी मार्गदर्शन केले. प्रसाद मिरसदार, ‘हाऊस ऑफ सक्सेस’चे संस्थापक व माध्यम तज्ञ यांनी कथा सांगण्याच्या अभिनव शैलीतून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा प्रवास समजावून सांगितला. तर अनिल वळसणकर, ‘स्वनिल प्रशिक्षण संस्था’चे संस्थापक आणि व्यवसाय उभारणी व्यवस्थापनाचे जाणकार यांनी नवउद्योजक कसे घडवायचे व त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अनुभव शेअर केले. संवादात्मक या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्षात नवनवीन उद्यम कल्पना विकसित करण्यासाठी आत्मविश्वासही मिळाला.





