Nagar : वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञांमार्फत साईमूर्तीची पाहणी

शिर्डी : साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी तसेच मूर्तीची झीज रोखण्यासाठी भाविकांसाठी दर्शन व्यवस्था तीन तास बंद ठेवून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञांमार्फत शुक्रवारी साईमूर्तीची पाहणी करण्यात आली.
साईबाबांच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ज्ञांनी मूर्तीच्या स्नानासाठी कमी पाण्याचा वापर करणे, मूर्तीला आंघोळ घातल्यानंतर टॉवेलने घासणे, दही-दुधाचा, गंधाचा वापर टाळणे, गंधासाठी चंदनाचाच वापर करणे आदी तोंडी सूचना केल्या. काही अंशी मूर्तीची झीज झाल्याचेही तज्ज्ञांनी मान्य केले. याबाबतचा लेखी अहवाल संस्थानला प्राप्त झाल्यानंतर साईसंस्थानची समिती निर्णय घेइल, असे साईसंस्थानचे प्रभारी सीईओ कोळेकर यांनी सांगितले.
वस्तू संग्रहालयाचे एस. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ज्ञांचे पथक सकाळीच शिर्डीत दाखल झाले. या पथकाने द्वारकामाई मंदिराची पाहणी केली. त्यानंतर दुपारी पावणे दोननंतर साईमंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद करण्यात आली. याशिवाय मूर्तीच्या बाजूने पडदे लावून मूर्तीचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी तज्ज्ञांनी सोहळे परिधान केले होते.
मूर्तीला जेथे काळे डाॅट आले आहेत, तसेच झीज झालेल्या ठिकाणची अद्ययावत कॅमेऱ्याने फोटोग्राफी करून ते अभ्यासासाठी संगणकात संरक्षित करण्यात आले. मूर्तीला काही इजा झालेली आहे की काय, याची पाहणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल तयार करून तो साइ संस्थानला पाठविण्यात येणार आहे. अहवालातील निष्कर्षावर साईसंस्थानच्या समितीची बैठक होऊन मूर्तीची झीज टाळण्यासाठी, योग्य त्या उपाययोजनांबाबत निर्णय घेणार आहे.





