Pune : जिल्हा रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी

पुणे : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य भवन येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यातील विभागवार आरोग्यसेवांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या वेळी जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, रुग्णालयातील विविध विभाग, बाह्यरुग्ण विभाग, तसेच आंतररुग्ण विभाग, माता बाल आरोग्यसेवा, नवजात विशेष काळजी कक्ष, डायलिसिस सेंटर, अस्थिरोग विभाग, तसेच विविध सेवा विभागांना भेट देऊन आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पुणे येथील मलेरिया, कुष्ठरोग, माता व बाल संगोपन, परिवहन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, आरोग्य प्रयोगशाळा, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, कुटुंब कल्याण, जलजन्य आजार, हत्तीरोग या विभागांच्या कार्याविषयी आरोग्य भवन येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथे झालेल्या बैठकीत माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या बैठकीला संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. राजरत्न वाघमारे, वैजनाथ गलांडे, विनोद फाले उपसंचालक, डॉ. राधाकिसन पवार, डॉ. रेखा गायकवाड, डॉ. संजयकुमार जठार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. सचिन देसाई, डॉ. प्रेमचंद कांबळे उपस्थित होते.





