पुणे जिल्हा | वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपायुक्तांची पाहणी

वाघोली, (प्रतिनिधी)- वाघोलीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी पाहणी केली; मात्र केवळ पाहणी न राहता प्रत्यक्षात उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. यापूर्वी तत्कालीन उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी व विजय मगर यांनीही पाहणी केली होती.
वाघोलीतील वाहतूक कोंडी पुणे नगर महामार्गावर प्रचंड वाढलेल्या वाहन संख्येने होत असली तरी त्यावर उपाययोजना होवू शकतात. यासाठी पुणे पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी एम आर डी ए व महावितरण यांच्या संयुक्त निर्णय व अंमलबजावणीची गरज आहे.
पाहणी होते, समस्या जाणून घेतल्या जातात; मात्र त्यावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन निर्णय होत नाही. पुणे पोलिसांकडून अधिक मनुष्यबळ, वॉर्डन, टोईंग व्हॅन, जॅमर यांसारख्या यंत्रणा पुरविण्याची गरज आहे; मात्र तेही मिळत नाही. इतर विभाग तर एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम करतात. वाहतूक अडथळा ठरणारे अतिक्रमणे, विद्युत पोल हटविण्याची गरज आहे.
महामार्गावरील पाणी जाण्यासाठी पावसाळी वाहिनी योजना नसल्याने पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. वाहतूक नियम मोडणार्यांवर कडक कारवाई हाही वाहतूककोंडी कमी करण्यासाठीची उपाययोजना आहे. स्कूल बसेस, कंपनी बसेस एका वेळी महामार्गावर येणार नाही, हाही उपाययोजनेचा भाग आहे.
अनधिकृत फ्लेक्समुळे अडथळा
अनधिकृत असलेले फ्लेक्स रस्त्यावर पडून वाहतुकीला अडथळा होतो. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पुणे नगर रोड वर होर्डिंग पडून चार तास वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकारही घडला. डीपी रस्ते विकसित केल्यास त्यातूनही वाहतूक कोंडी कमी होईल.
वाघोलीतील वाहतूक कोंडीचा फटका अनुभवणारे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात आले आहे. यामुळे त्यांच्या स्तरावर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून तात्काळ निर्णायक अंमलबजावणी केल्यास कोंडी नक्की कमी होईल.





