नेपल्स (इटली) : आयएनएस तमाल ही भारतीय नौदलाची रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असलेली अत्याधुनिक युद्धनौका अलिकडेच इटलीतील नेपल्स येथे दाखल झाली. नेपल्स बंदरात प्रवेश करण्यापूर्वी आयएनएस तमाल इटालियन नौदलात नव्याने दाखल झालेल्या आयटीएस ट्रीएस्ट या युद्धनौकेसोबत संयुक्त युद्धसरावामध्ये सहभागी झाली होती. या संयुक्त सरावामध्ये संचार सराव, समुद्रामध्ये जहाजाच्या हालचाली व उड्डाण सराव, सागरी सैनिकांना एकमेकांच्या नौकांवर पाठवणे यांचा समावेश होता आणि अखेरीस स्टीम पास्टने त्याचा समारोप झाला. नेपल्स बंदरातील या भेटीदरम्यान या जहाजाने भारत आणि इटली यांच्यातील संरक्षण सहकार्य व सहयोग वृद्धिंगत करण्याच्या हेतूने वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय चर्चा तसेच व्यावसायिक देवाणघेवाण हे या भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. जहाजाच्या कमांडिंग ऑफिसरने इटालियन नौदलाच्या लॉजिस्टिक्स कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस ॲडमिरल पीअरपाओलो बद्री आणि नेपल्सच्या उपमहापौर लॉरा लिएटो यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांनी भारत – इटली रणनीतीक कृती आराखडा २०२५-२०२९ अंतर्गत विविध उपक्रमांवर चर्चा केली. आयएनएस तमाल आणि रोममधील भारतीय दूतावासाने संयुक्तपणे जहाजावर एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये स्थानिक सरकारचे अधिकारी, इटालियन नौदलाचे अधिकारी, रोमस्थित राजनैतिक प्रतिनिधी, इटलीतील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी तसेच इटली संरक्षण उद्योगातील नेते सहभागी झाले. इटली प्रजासत्ताकातील भारताच्या राजदूत वाणी राव यांनी देखील जहाजाच्या तुकडीशी आणि इटालियन नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जहाजावर संवाद साधला. दिनांक १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जहाजावर एक औपचारिक संचलन आयोजित करण्यात आले होते. जहाजाच्या तुकडीने रोममधील भारतीय दूतावासातील स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला.