‘त्या’ जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी : राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई – पालघर जिल्ह्यात मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. पालघर जिल्ह्यातील किराट गाव येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित करताना झालेला गैरव्यवहार याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य मनीषा चौधरी, नाना पटोले, राजेश पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
विखे-पाटील म्हणाले, या प्रक्रियेत अनेक विभागांचा सहभाग आहे. या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात येतील आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या बदल्या तरतुदींनुसारच – शंभुराज देसाई
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने केलेल्या आहेत. ही प्रक्रिया कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पाडली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना भाई जगताप यांनी मांडली होती. देसाई म्हणाले, विभागात 254 मंजूर पदे असून त्यातील 201 पदे कार्यरत आहेत. यापैकी 61 पदे यावर्षी बदलीस पात्र होती. प्रत्यक्षात 52 पदांच्या बदल्या केलेल्या असून त्यापैकी 42 अधिकाऱ्यांच्या बदल्या पसंतीक्रमानुसार, 14 बदल्या विनंतीनुसार तर 10 बदल्या प्रशासकीय कारणास्तव केलेल्या आहेत.





