Nagar | पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीचे आदेश

नगर, (प्रतिनिधी) – विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितला अहवाल वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून घेतले असून, याबाबत विभागीय आयुक्तांनी अहवाल मागविला आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी वादग्रस्त पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्राची कागदपत्रे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे यांची बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी अहवाल देण्यात येणार असून, तो अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. खेडकर यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तत्कालीन मंडळातील तीन सदस्यांचा खुलासा घेण्यात येणार आहे.
राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (मूळ राहणार ता. पाथर्डी, जिल्हा नगर), हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान खेडकर यांना डोळे आणि मानसिक आजाराचे अपंगत्व प्रमाणपत्र नगरच्या जिल्हा रुग्णालयातून देण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाने केलेल्या अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्राचा समावेश असल्याची माहिती पुढे आली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच याबाबतचा संपूर्ण अहवाल सादर केला जाणार आहे.





