सामाजिक न्याय विभागावर अन्याय? लाडक्या बहिणींसाठी सरकारची दमछाक; अनुसूचित जातींचा ४१० कोटींचा निधी वळवला

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसत आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410 कोटी 30 लाख रुपये निधी वळविण्यास गुरुवारी राज्य सरकारने मंजुरी दिली.
सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी 3960 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून, त्यातील 410 कोटी रुपये गुरुवारी महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आले. मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा निधी लाभार्थ्यांना वितरीत करण्यास महिला व बालविकास विभागाने मंजुरीही दिली. Ladki Bahin Yojana |
आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाचा 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला
सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी तीस लाखांचा निधी दोन वेळा वळवला आहे. आतापर्यंत सामाजिक न्याय या विभागाचा एकूण 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला आहे. तर आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी तीन वेळा वळवला आहे. आदिवासी विभागाचे आतापर्यंत 1 हजार 7 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. दोन्ही विभागांचा मिळून 1827 कोटींचा निधी लाडके बहीण योजनेकडे वळवला आहे.
याशिवाय विभागाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून द्यावी, तसेच या निधीचा उपयोग त्याच प्रवर्गातील लाभार्थी महिलांना होईल, याची काळजी घेण्याची सूचना दिल्याचीही माहिती समोर आली आहे. हे पैसे विभागाकडे आल्यानंतर हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. Ladki Bahin Yojana |
हेही वाचा:





