पुणे जिल्हा | जखमी ज्ञानेश्वरीची झुंज अखेर 42 दिवसानंतर संपली

लोणी काळभोर, (वार्ताहर) – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकाजवळ 10 जूनला दोन दुचाकी व बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वरीची मृत्यूची सुरु असलेली झुंज अखेर 42 दिवसानंतर संपली.
ज्ञानेश्वरी शामराव लाटे (वय 19, रा. लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी ज्ञानेश्वरीचा मामा शिवराम बन्सी कराड (वय 38, रा. एमआयटी स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पीएमपीएल चालक सोमनाथ बाळासाहेब बसाटे (वय. 45, रा. कवडीपाट टोलनाका, ता. हवेली जि. पुणे) व दत्ताराम रमेश कांबळे (वय.34, गंगानगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराम कराड व ज्ञानेश्वरी लाटे हे दोघे नात्याने मामा-भाची आहे. ज्ञानेश्वरी ही तिच्या मामाकडे रहात होती.
ती वाघोली येथील एका परिचारका महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. महाविद्यालयात जाण्यासाठी तिचे मामा दररोज तिला दुचाकीवरून बस स्टॉपपर्यंत सोडवत होते. ज्ञानेश्वरीला शाळेत सोडविण्यासाठी जाताना 10 जूनला अपघात झाला.
ज्ञानेश्वरी गाडीवरून उडून पीएमपीएमएल बससमोर पडल्याने तिला बसने 10 ते 12 फुट फरफटत नेले होते. ज्ञानेश्वरीवर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अखेर मृत्यूशी सुरु असलेली झुंज 42 दिवसानंतर अपयशी ठरली.





