औषध विक्रेत्यांना नियमांचे ‘इंजेक्शन’

“रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी ठोस पावले
पुणे – करोना अत्यवस्थ रुग्णांमधील विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी “रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन दिले जाते. परंतु, मागील काही दिवसांमध्ये या इंजेक्शनमध्ये काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून ठोस पावले उचलली आहेत.
आता, “रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांना त्यांना लागण असल्याचा पॉझिटिव्ह अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, औषध विक्रेत्यांना रेमडेसिवीरची विक्री करण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. करोना उपचारात वापरलेले जाणारे रेमडेसिवीर हे 5 हजार 400 रुपये किमतीचे इंजेक्शन चक्क 16 हजार रुपयांना विकले जाऊ लागले.काही ठिकाणी याहीपेक्षा जादा किंमती आकारल्या जात आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पावले उचलली आहेत.
औषधांचे प्रिस्क्रिप्शन हे कोविड रुग्णालयातील डॉक्टरांचे आहे का, याची माहिती घेण्यात यावी, अशा सूचना एफडीएने केल्या आहेत. औषध विक्रीचा दैनंदिन अहवाल विहित प्रपत्रात व्हाट्सऍपवर पाठवावा. रेमडेसिवीर इंजेक्शनचा विक्री अहवाल दररोज एफडीएला पाठवावा, अशा सूचनाही सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी केल्या आहेत.





