Infosys share : इन्फोसिसचा शेअर 5 टक्क्यांनी वाढला, जाणून घ्या कारण

Infosys share – माहित तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळाने 11 सप्टेंबर रोजी शेअरच्या बायबॅक प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मंगळवारी इन्फोसिस कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांनी वाढून 1,504 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला.
परिणामी या कंपनीचे बाजार मूल्य एकाच दिवसात 29,967 कोटी रुपयांनी वाढून 6.25 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्ससंबंधातील इतर सर्व कंपन्यात इन्फोसिस कंपनीच्या शेअरचा भाव आज जास्त वाढला. यामुळे केवळ इन्फोसिस कंपनीच्या शेअरचा भाव वाढला नाही, तर इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. परिणामी मुख्य निर्देशांकांनाही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा आधार मिळाला.
इन्फोसिस कंपनीने शेअर बाजाराला सोमवारी कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, सेबीच्या बायबॅक नियम 2018 अंतर्गत शेअर बायबॅक करण्यासंदर्भात कंपनीचे संचालक मंडळ 11 सप्टेंबर रोजी विचार करणार आहे. संचालक मंडळाचा निर्णय 11 सप्टेंबर रोजी शेअर बाजारांना कळविण्यात येईल.
इन्फोसिस कंपनीने 2022 मध्ये हे 9,300 कोटी रुपयांच्या शेअरचे बायबॅक केले होते. यामुळे शेअरच्या किमती वाढतात आणि कंपनीच्या सध्याच्या भागधारकांना याचा लाभ होतो. कंपनीच्या नफ्यात भागधारकांना सामील करून घेण्यासाठी अनेक वेळा कंपन्या बायबॅकचा मार्गाचा अवलंब करतात.
सध्या शेअर बाजारात कमालीचे अस्थिर वातावरण आहे.अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना भविष्याबाबत खात्री देण्यासाठी अनेकदा कंपन्या बायबॅकचा निर्णय घेत असतात. अमेरिकेतील अनिश्चित परिस्थिती तसेच अमेरिकेचे भारताविरोधातील धोरण या कारणामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या अमेरिकेला होणार्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता बर्याच गुंतवणूकदारांना वाटत असतानाच इन्फोसिस कंपनीने बायबॅकचा निर्णय घेतला आहे.





