पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत आरटीसाठी आलेल्या अर्जाची स्वतंत्र आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही. राज्य शिक्षण विभागाकडून तशी आकडेवारी जाहीर करण्यात आली नसल्याचे महापालिकेचा शिक्षण विभाग सांगत आहे. त्यामुळे शहरात नेमके किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत याची माहितीच मिळत नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला आठ दिवस उलटले असून अद्याप शहरातील किती पालकांनी आरटीईसाठी अर्ज केले, याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. संकेतस्थळावर तालुक्यानुसार प्राप्त अर्जांची संख्या दिसत नसल्याने किती जणांनी अर्ज केले हे समजत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरामध्ये ३२२ शाळांची आरटीईसाठी नोंदणी झाली आहे. ८ हजार ५० जागांवर आरटीईतून प्रवेश निश्चित केला जाणार आहे. १० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. पालकांना अर्ज भरण्यासाठी मदत करण्याकरिता सहायक शिक्षकांची केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी पालक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्रावर जात आहेत; मात्र आतापर्यंत किती पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले याची माहिती शिक्षण विभागालाच नसल्याचे समोर आले आहे. संकेतस्थळावर किती जणांनी अर्ज केले याची एकत्रित आकडेवारी येत आहे. तालुक्यानुसार आकडेवारी येत नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते समजत नाही. परिणामी, राज्य सरकारने आरटीईच्या नियमात बदल केल्यानंतर पालकांचा प्रतिसाद कसा आहे याबाबत स्पष्टता येत नाही. येत्या काही दिवसांत सुधारणा होऊन शहराचीही आकडेवारी दिसेल. त्यानंतर किती पालकांनी अर्ज केले आहेत याची माहिती मिळेल, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.