CNG Price Hike : महागाईच्या झळा तीव्र! CNGच्या दरात वाढ; रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता
CNG Price Hike : मुंबई आणि परिसरात सीएनजीचा नवा दर ८४ रुपये प्रति किलो

CNG Price Hike : महागाईच्या झळा तीव्र होत असल्याचं आता दिसत आहे. खाद्य तेल, सिलेंडर आणि दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता CNG देखील महागला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही 2 रुपयांनी प्रति किलोमागे वाढ केली असून त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
सीएनजीचे दर वाढल्याने भाडेवाढ देखील करावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी युनियनने केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केल्याने मुंबई महानगर प्रदेशातील लाखो प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागण्याची शक्यता आहे.
सीएनजीचा नवा दर ८४ रुपये प्रति किलो (CNG Price Hike)
या दरवाढीनंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा नवा दर ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. ही दरवाढ १४ मे च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. महानगर गॅसने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा फटका थेट मुंबईकरांच्या खिशाला बसला आहे.
दरम्यान, ही वाढ झाली असली तरी, महानगर गॅसने असा दावा केला आहे की इतर इंधनांच्या तुलनेत सीएनजी अजूनही सर्वसामान्यांसाठी किफायतशीर आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे ४४% तर डिझेलच्या तुलनेत ७% बचत होते, असे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता पेट्रोल डिझेलपेक्षा CNG स्वस्त अशी ओळख असणाराही तोही खिशाला परवडेनासा होणार आहे.
PNG दरात वाढ नाही (CNG Price Hike)
दुसरीकडे, वाहनधारकांना फटका बसला असला तरी, घरगुती वापराच्या पाईप गॅसच्या (PNG) दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गृहिणींचे बजेट कोलमडू नये म्हणून पीएनजीचा दर ५० रुपये प्रति युनिट असाच स्थिर ठेवण्यात आला आहे.
दरवाढीमागे तीन प्रमुख कारणे
- पश्चिम आशियातील युद्ध हे पहिलं कारण आहे. इराण आणि आसपासच्या प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
- देशांतर्गत गॅसची उपलब्धता कमी झाल्याने महागड्या परकीय गॅसवर अवलंबित्व वाढले असून, कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्या आहेत.
- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे गॅस आयात करण्यासाठी भारताला अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
एमएमआर क्षेत्रात सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर चालतात. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बसचा समावेश आहे. सीएनजीच्या या दरवाढीमुळे रिक्षाचालकांचा प्रति किलोमीटरचा खर्च सुमारे १.०३ रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांनी भाड्यात किमान १ रुपयाची वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे.
तर टॅक्सी संघटनांकडून २ रुपयांच्या भाडेवाढीचे संकेत मिळत आहेत. तसेच बेस्ट आणि एसटी प्रशासनावरही या दरवाढीमुळे करोडो रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींना पर्याय म्हणून सीएनजीकडे वळलेल्या मध्यमवर्गीयांना आता वाढीव खर्चाचा सामना करावा लागेल. CNG Price Hike
हेही वाचा:
Milk Price Hike: महागाईचा झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून दरात वाढ






