ब्रिटनमधील विद्यार्थ्यांना महागाईचा फटका

अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणेही झाले अवघड
लंडन : जगाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये येतात पण गेल्या काही कालावधीपासून ब्रिटनला महागाईचा तडाखा बसत असल्याने त्याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावरही झाला आहे. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही विद्यार्थ्यांना अशक्यप्राय झाले आहे.
विद्यार्थ्यांना सर्वात जास्त समस्या राहण्याची भासत असून अनेक विद्यार्थ्यांना राहण्याची ठिकाणे सोडावी लागली आहेत. ब्रिटनमध्ये सध्या महागाईचा दर नऊ टक्के झाला, असून त्यामुळे सर्वच दर भडकले आहेत त्याचा मोठा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे. ताज्या आकडेवारीप्रमाणे ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या 12 टक्के विद्यार्थ्यांना राहण्यासाठी घर नाही ब्रिटनमध्ये राहण्यासाठी जी घरे उपलब्ध आहेत. ती त्यांना परवडत नाहीत त्यामुळे अनेकांना आपल्या मित्रांचा किंवा नातेवाईकांचा आश्रय घ्यावा लागत आहे पण जे विद्यार्थी आपल्या नातेवाईकांकडे राहत होते त्यांनाही घर सोडावे लागत आहे.
काही विद्यार्थी पार्टटाईम नोकरी करून शिक्षणाचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना जिथं जागा उपलब्ध होईल तिथे राहण्याचे काम करावे लागत आहे. देशामधील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या समस्येवर विद्यापीठाकडून कोणताही तोडगा काढण्यात येत नाही. खाण्याची आणि राहण्याची सोय करणे हे विद्यार्थ्याचे स्वतःचे काम आहे अशी भूमिका विद्यापीठांच्या प्रशासनाने घेतली आहे.
लंडन मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटीचे प्रोफेसर लेनिन फुलरेनन यांनी मात्र विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना मदत करायला हवी अशी मागणी केली आहे. ब्रिटनमध्ये विविध संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या या अवस्थेचा अहवाल हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. यूनिवर्सिटी ऑफ स्कॉटलांडने याबाबत सर्वे केला असून त्याचे निष्कर्ष या नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत.





