पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका! टोमॅटो 600, कांदा 120रुपये किलो; भारत नव्हे, तर ‘या’ देशामुळे झाली बिकट अवस्था

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये (Pakistan) खाद्यपदार्थांच्या दरांनी पुन्हा एकदा गगन भरारी घेतली आहे. ताज्या माहितीनुसार, तेथे टोमॅटोच्या किमतीत (Tomato Price in Pakistan) एका महिन्यात तब्बल ४००% वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात १ किलो टोमॅटोचा दर ६०० पाकिस्तानी रुपये (PKR) झाला आहे, जो भारतीय चलनात सुमारे १८९ रुपये इतका आहे.
टोमॅटो, आले, लसूण… सगळेच महागले!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनुसार, टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे एक टोमॅटो ७५ PKR रुपयांना विकला जात आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, केवळ टोमॅटोच नाही, तर इतर भाज्या आणि मसाल्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत:
टोमॅटो: ६०० PKR/किलो (काही शहरांत ७०० PKR पर्यंत)
आले (अदरक): ७५० PKR/किलो
लसूण: ४०० PKR/किलो
मटार: ५०० PKR/किलो
कांदा: १२० PKR/किलो
हिरवी कोथिंबीर: एका लहान जुडीसाठी ५० PKR
वाढत्या महागाईचे कारण: अफगाणिस्तान सीमा बंद!
पाकिस्तानमध्ये अचानक झालेल्या या प्रचंड दरवाढीचे मुख्य कारण आहे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील (Pakistan-Afghanistan Border) व्यापार बंद होणे. ११ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सीमेवर झालेल्या चकमकी आणि त्यानंतर अफगाणिस्तानमधील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे सीमेपलीकडील व्यापार थांबला. पाकिस्तान अनेक खाद्यपदार्थांसाठी आयातीवर अवलंबून आहे आणि यातला मोठा साठा अफगाणिस्तानातून येतो. सीमा सील झाल्यामुळे पुरवठ्यात मोठी घट झाली आहे.
इस्तंबूलमध्ये झालेली शांतता चर्चा तणाव कमी करण्यात अयशस्वी ठरली, ज्यामुळे सीमा अद्यापही सील आहे आणि व्यापार ठप्प आहे. याच कारणामुळे पाकिस्तानमध्ये महागाईमध्ये जबरदस्त वाढ नोंदवली गेली असून, नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा आर्थिक संघर्ष करावा लागत आहे.





