काश्मीर सीमेवरील घुसखोरीचा डाव उधळला ; चार दहशतवादी ठार
Updated On:

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी हद्दीतून दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा दलांच्या दक्ष जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमधील काला जंगल भागात हा प्रयत्न झाला.
काश्मीर विभागाच्या पोलिसांनी एका ट्विटर संदेशात ही माहिती दिली आहे. गेले काही दिवस पाकिस्तानी हद्दीतून भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न वाढले असले तरी सीमा भागात भारतीय सुरक्षा दलांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या शुक्रवारीही केरन सेक्टरमधील जुमागुंड भागात पाच दहशतवाद्यांचा खात्मा करीत सुरक्षा दलांनी त्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.





