K. Surendran : केरळ भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर; पोटनिवडणुकीतील पराभव कारणीभूत

थिरूवनंतपूरम : केरळमधील पलक्कड विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झालेल्या भाजपच्या मतांच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली. त्यानंतर त्या पक्षाच्या प्रदेश शाखेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्या राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी थेट उमेदवार निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे पुढे येत प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रन यांनी पक्षाच्या पीछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारली.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने कॉंग्रेस नेते शफी परम्बिल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे पलक्कडमध्ये पोटनिवडणूक झाली. त्या मतदारसंघातील मागील काही निवडणुकांत भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे यावेळची पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग त्या पक्षाने बांधला.
मात्र, कॉंग्रेसचे उमेदवार राहुल ममकुटथिल यांनी १८ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवत तो मतदारसंघ पक्षाकडे कायम ठेवला. त्यांना ५८ हजारांहून अधिक मतं मिळाली. भाजपचे उमेदवार सी.कृष्णकुमार यांना ३९ हजार ५४९ मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या डाव्या आघाडीच्या उमेदवाराने ३७ हजारांपेक्षा अधिक मतं मिळवली.
केरळमध्ये २०२१ यावर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी पलक्कडमध्ये विजयी झालेल्या परम्बिल यांनी ५४ हजारांहून अधिक मतं मिळवली होती. त्यावेळी भाजपने मेट्रोमन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ई.श्रीधरन यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी त्यावेळी ५० हजारांपेक्षा अधिक मतं मिळवली. त्यांना ४ हजारांपेक्षाही कमी मताधिक्याने पराभूत व्हावे लागले.
मतांमधील तो फरक अतिशय कमी असल्याने भाजपला यावेळी विजय खेचून आणण्याचा विश्वास वाटत होता. प्रत्यक्षात भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला. तसेच, त्या उमेदवाराच्या वाट्याला आधीपेक्षा कमी मतं आली. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी उमेदवार निवडीविषयी नाराजी व्यक्त केली. उमेदवार जाहीर होण्याआधी भाजपच्या काही नेत्यांनी इतर नावेही पुढे केली होती.





