‘असमानता’ ही एक मोठी समस्या; रघुराम राजन यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून केंद्रातील मोदी सरकारवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे किंवा त्यांच्याकडून सरकारच्या काही बाबींबद्दल दर्शवल्या जाणाऱ्या असहमतीमुळे राजन यांच्यावर टीका केली जाते. सोशल मीडियावर त्यांच्याकडे डाव्या विचारसरणीचे म्हणून पाहिले जाते आणि तशी टीकाही त्यांच्यावर केली जाते. त्या अनुशंगाने एका इंग्रजी माध्यमाच्या कार्यक्रमात राजन यांनी मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे.
राजन म्हणाले की आर्थिक दृष्ट्या भारतात प्रत्येक जण सेंटर टू लेफ्ट अर्थात मध्यममार्गाकडून डावीकडे झुकलेला आहे. मात्र मला असा मध्यममार्गी मानले जाते जो उजवीकडे झुकलेला आहे. मला व्यक्तीश: असे वाटते की सामाजिक दृष्ट्या विचार करता मी सेंटर टू लेफ्ट अर्थात डावीकडे झुकलेला आहे. याचा अर्थ जेवढी उदार सामाजिक रचना आपण प्राप्त करू शकू तेवढी मला हवी आहे. कारण मला असे वाटते की आपल्याकडे असमानता हीच मोठी समस्या असून ती दूर करण्याची गरज आहे.
विविध समुहांशी केला जाणारा असमान व्यवहार ही एक मोठी अडचण आहे. यातल्या काही बाबी ऐतिहासिक आहेत तर काही नवीन आहेत. आपल्याला त्याकडे अगोदर लक्ष द्यावे लागणार आहे. सगळ्यांचे आरोग्य आणि शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. जर तुमची लोकसंख्या सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न नसेल तर त्यांचा विकास कसा होणार? हीच माझी साधी फिलॉसॉफी आहे. डॉ. रघुराम राजन यांनी अर्थतज्ज्ञ रोहीत लांबा यांच्यासह याच विषयावर भारताचे आर्थिक भविष्य काय असेल याबाबत एक पुस्तक लिहिले असून ब्रेकिंग द मोल्ड हे त्या पुस्तकाचे नाव आहे.



