#INDvWI 3rd ODI : प्रयोग सुरूच राहणार – रोहित

अहमदाबाद – यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय अनेकांना पटला नसल्याने कर्णधार रोहित शर्मावर टीका सुरू झाली. मात्र, हा एक प्रयोग होता व यापुढेही असेच काही प्रयोग केले जातील, असा खुलासा रोहितने केला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने रोहितसह सलामी केली होती. दुसऱ्या सामन्यात पंतने रोहितसह डावाची सुरुवात केली. आता तिसऱ्या सामन्यात शिखर धवनला संधी मिळेल, असे संकेतही रोहितने दिले आहेत.
त्याचवेळी या सामन्यासाठी संघात परतलेला नियमित सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. यासारखेच प्रयोग करण्याचीच आमची योजना आहे. पुढील मोसमात भारतीय संघाला सातत्याने सामने खेळायचे आहेत.
त्यामुळे असे प्रयोग करणे संघासाठी लाभदायकच ठरणार आहे व कोणता खेळाडू त्याचा नियमित क्रमांक सोडून अन्य क्रमांकावर फलंदाजी करू शकतो की नाही हेच पाहण्याचा हेतू या प्रयोगांमध्ये आहे, असे रोहितने सांगितले.





