#INDvWI 2nd Test Lunch on Day 2 : कोहलीच्या शतकाने भारताचे वर्चस्व…

त्रिनिदाद :- प्रमुख फलंदाज विराट कोहलीने फटकावलेले दमदार शतक व रवींद्र जडेजाची अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजच विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुक्रवारी दुसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या डावात(Lunch) उपाहाराला खेळ थांबला तेव्हा 6 गडी गमावून 373 धावा केल्या होत्या.
कोहली 121 धावांवर धावबाद झाला तर जडेजा 61 धावा करुन परतला. यावेळी इशान किशन 18 तर रवीचंद्रन अश्विन 6 धावांवर खेळत होते.
पहिल्या दिवशीच्या 4 बाद 288 धावांवरुन भारताने आपला पहिला डाव पुढे सुरू केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर कोहली व जडेजाने सावध सुरुवात केली. पहिल्या दिवशी रोहित, जयस्वाल व गिल बाद झाल्यावर रवींद्र जडेजाने कोहलीला सुरेख साथ देत संघाचे द्विशतक फलकावर लावले.
दरम्यान, कोहलीने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याने जडेजासह पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत संघाच्या अडचशे धावाही पूर्ण केल्या. कोहली शतकाकडे कूच करत होता व जडेजाही त्याला तोलामोलाची साथ करत होता.
कोहलीने आपला पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दमदार शतक फटकावले. त्यानंतर मात्र, तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 121 धावांवर धावबाद झाला. या खेळीत त्याने 206 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार फटकावले. त्याला सुरेख साथ देताना जडेजानेही अर्धशतक साकार केले. यानंतर तो 61 धावांवर परतला. त्याने या खेळीत 152 चेंडूत 5 चौकार फटकावले.
या जोडीने पाचव्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी केली. त्यानंतर जडेजाने इशान किशनच्या साथीत संघाच्या साडेतीनशे धावा फलकावर लावल्या. जडेजा बाद झाल्यावर रवीचंद्रन अश्विनने किशनला साथ देत पहिले सत्र खेळून काढले.
तत्पूर्वी, शतकी सलामी दिल्यावर यशस्वी जयस्वाल 74 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार फटकावताना 57 धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने साफ निराशा केली. तो 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर शतकाच्या जवळ आलेला रोहित शर्मा 80 धावांवर बाद झाला. त्याने जयस्वालच्या साथीत 139 धावांची सलामी दिली.
रोहितने आपल्या खेळीत 143 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर कोहलीने रोहितच्या साथीत संघाचे दीडशतक फलकावर लावले. रोहित परतल्यावर आलेल्या अजिंक्य रहाणे तब्बल 36 चेंडूंचा सामना करत अवघ्या 8 धावांवर बाद झाला.
कोहलीने रचला इतिहास…
पाचशेव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली आहे. कारकीर्दीतील पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना त्याने अर्धशतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला असून त्याने 25 हजार 548 धावा करताना दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या कामगिरीला मागे टाकले आहे. तसेच त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या कसोटी इतिहासात 2 हजार धावांचा पल्लाही गाठला आहे.
लक्षवेधी..
– रोहितच्या 443 सामन्यांतून 17 हजार 300 धावा
– माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला टाकले मागे
– धोनीच्या 538 सामन्यांतून 17 हजार 266 धावा
– या यादीत पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे
– त्याच्या 664 सामन्यांत 34 हजार 357 धावा
– रहाणेचे कसोटी संघातील स्थान व उपकर्णधारपदही धोक्यात
– भारतीय संघ आता तब्बल पाच महिन्यांनंतर खेळणार कसोटी
– भारतीय संघ करणार दक्षिण आफ्रिकेचा दौरा





