#INDvSA Test Series : माजी क्रिकेटपटू दोड्डा गणेशची निवड समितीवर टीका, म्हणाले “कसोटीसाठी राहुलला यष्टीरक्षक…”

बंगळुरु :– दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत लोकेश राहूलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात निवडले गेल्यामुळे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दोड्डा गणेश याने निवड समितीवर टीका केली आहे. राहुल एक परिपूर्ण सलामीवीर फलंदाज असतानाही त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर कसोटीत फलंदाजी करण्यासाठी निवडण्यात आल्याचा निर्णय अनाकलनिय आहे. त्याचा सलामीवीर म्हणून अनुभव पाहता त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले पाहीजे, अशा शब्दात भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दोड्डा गणेश यांनी निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.
राहुल दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता. आता तो पूर्ण तंदुरुस्त होउन आशिया करंडक स्पर्धेद्वारे संघात परतला. तसेच त्याने यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही भरीव कामगिरी केली आहे. त्याच्याकडे सुरुवातीच्या काळापासून एक सलामीवीर फलंदाज म्हणूनच पाहात आलो आहोत. मग अचानक कसोटी क्रिकेटसाठी त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कसे काय निवडले गेले. जर संघात इशान किशन यष्टीरक्षण करणार आहे तर राहुलला केवळ एक फलंदाज म्हणून खेळवणे योग्य ठरले असते.
निवड समिती जर पुढील पाच वर्षांचा विचार करत असेल तर त्यांनी राहुलला दुहेरी जबाबदारीत गुंतवून ठेवू नये. त्याच्याकडे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे मात्र, त्याचा सलामीवीर म्हणून अनुभव मोठा आहे. जो ज्या स्थानावर सातत्याने चांगली खेळी करत आला आहे त्यालाच त्या स्थानावर खेळवले गेले पाहीजे. अन्यथा त्याला अपयशाचा सामना करावा लागू शकतो, असेही ते म्हणाले.
राहुलकडे संयम आहे, जिद्द आहे. संघ बिकट स्थितीत असताना त्याने अनेकदा जबाबदारीने फलंदाजी करत संघाला बळकटी प्राप्त करुन दिली आहे. जर कसोटी नियमित कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करणार आहे तर त्याच्याबरोबर अन्य कोणत्या फलंदाजापेक्षा राहुलच जास्त योग्य आहे, असेही ते म्हणाले.


