#INDvSA 1st Test Day 1 : पहिल्याच दिवशी भारताची पकड, राहुलचे नाबाद शतक तर मयंकचे अर्धशतक

सेंच्युरीयन – सलामीवीर लोकेश राहुलचे नाबाद शतक, मयंक आग्रवालचे अर्धशतक तर कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणेची उपयुक्त खेळी यांच्या जोरावर भारताने रविवारपासून सुरु झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर पहिल्याच दिवशी पकड मिळवली. पहिल्या दिवसअखेर भारताने 3 बाद 272 धावा केल्या असून खेळ थांबला तेव्हा राहुल 122 तर रहाणे 40 धावांवर खेळत आहेत.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना राहुल व मयंक या दोन्ही सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. मयंक 60 धावांवर परतल्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा निराशा केली. त्यानंतर कर्णधार कोहलीने राहुलच्या साथीत संघाचे दीडशतक फलकावर लावले. राहुलने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. मात्र, त्याचवेळी कोहली भरात असतानाच बाहेरच्या चेंडूला बॅट लावून बाद झाला. त्याने राहुलसह तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली.
कोहली परतल्यानंतर रहाणेने राहुलला सुरेख साथ देत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. राहुलने शतकी पल्ला पार केल्यावरही जबाबदारीने फलंदाजी केली व संघाला अडीचशे धावांच्यापुढे मजल मारुन दिली.
खेळ थांबला तेव्हा राहूल 248 चेंडूत 16 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 122 धावांवर खेळत आहे. रहाणेनेही अपयशातून बाहेर येत 81 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 40 धावांची खेळी केली. राहुलने रहाणेच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 73 धावांची अखंडीत भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्जीडीने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 90 षटकांत 3 बाद 272 धावा. (मयंक आग्रवाल 60, विराट कोहली 35, लोकेश राहुल खेळत आहे 122, अजिंक्य रहाणे खेळत आहे 40, लुंगी एन्जीडी 3-45).





