#INDvSA 4th T20 : कार्तिक व पंड्याने सावरले; भारताचे आफ्रिकेसमोर 170 धावांचे लक्ष्य

राडकोट – प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशानंतर दिनेश कार्तिक व हार्दिक पंड्या यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 लढतीत 20 षटकांत 6 बाद 169 अशी समाधानकारक मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघ्या 5 धावांवर परतला. तर पाठोपाठ श्रेयस अय्यरही 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर इशान किशनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो 27 धावांवर बाद झाला. कर्णधार ऋषभ पंतने 17 धावांवर बेजबाबदार फटका मारून बाद होत पुन्हा एकदा टीकाकारांनी टीका करण्याची संधी दिली.
त्यानंतर मात्र, कार्तिकने पंड्याला साथीला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने तुफानी फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. कार्तिकने दमदार अर्धशतक फटकावले. मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने आपल्या 55 धावांच्या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 2 षटकार फटकावले.
पंड्याला मात्र अर्धशतक साकार करण्यात अपयश आले. तो 31 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा करून बाद झाला. भारताचा डाव 20 षटकांत 6 बाद 169 धावांवर रोखला गेला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्जीडीने 2 गडी बाद केले. अनरीच नोर्जे, केशव महाराज, मार्को जेन्सन व ड्वेन प्रीटोरियस यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 6 बाद 169 धावा. (दिनेश कार्तिक 55, हार्दिक पंड्या 46, इशान किशन 27, लुंगी एन्जीडी 2-20).





