#INDvSA 3rd T20 | ऋतूराज, इशान व पंड्याची चमक; भारताचे आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य

विशाखापट्टणम – सलामीवीर ऋतूराज गायकवाड व इशान किशन यांच्या जबाबदार अर्धशतकी खेळीनंतर अष्टपैलु हार्दीक पंड्याने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर यजमान भारताने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 180 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत भारतालाच पुन्हा फलंदाजी दिली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या ऋतूराजने या सामन्यात मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याने इशानच्या साथित 97 धावांची भक्कम सलामी दिली. 35 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांची अर्धशतकी खेळी केल्यावर ऋतूराज बाद झाला. त्यानंतर इशानने श्रेयस अय्यरसह संघाला शतकी मजल मारुन दिली.
अय्यर स्थिरावलेला असताना आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात 14 धावांवर परतला. दरम्यान इशाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले. मात्र, यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 35 चेंडूत 5 चौकार 2 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर खेळपट्टीवर आलेल्या कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले. तो केवळ 6 धावा काढून बाद झाला.
यानंतर हार्दीक पंड्याने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत नाबाद 31 धावा करत संघाला 20 षटकांत 5 बाद 179 अशी समाधानकारक मजल मारुन दिली. अखेरच्या पाच षटकांत भारताने भरात असलेले फलंदाज गमावल्यामुळे द्विशतकी धावसंख्या उभारण्यात भारताला यश आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रीटोरियसने 2 गडी बाद केले. केशव महाराज, कागिसो रबाडा व तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 5 बाद 179 धावा. (ऋतूराज गायकवाड 57, इशान किशन 54, श्रेयस अय्यर 14, हार्दीक पंड्या नाबाद 31, अक्सर पटेल नाबाद 5, ड्वेन प्रीटोरियस 2-29, केशव महाराज 1-24, कागिसो रबाडा 1-31, तबरेज शम्सी 1-36).





