लक्षवेधी जोड
– विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांची निराशा
– राहुल व जडेजा यांची नाबाद शतकी भागीदारी
– टीकेचा धनी असलेल्या राहुलची संयमी खेळी
– जडेजाचा कसोटीतील फॉर्म या मालिकेतही कायम
मुंबई – प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर भरात नसलेल्या लोकश राहुलने टीकाकारांना चोख प्रत्यत्तर देताना नाबाद अर्धशतकी खेळी केली व रवींद्र जडेजाच्या साथित नाबाद शतकी भागीदारी करत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकिदिवसीय सामन्यात स्वप्नवत विजय मिळवून दिला.
निचांकी धावसंख्येच्या या सामन्यात भारताची अवस्थाही एकवेळ 4 बाद 39 आणि 5 बाद 83 अशी बिकट बनली होती मात्र, त्यानंतर राहुल व जडेजाने ऑस्ट्रेलियाला एकही संधी न देता तिन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत केले व भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळून दिली.
ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांवर रोखल्यावर सगळ्यांनाच भारताच्या सहज विजयाची खात्री वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच निर्माण झाले. सलामीवीर इशान किशन 3, विराट कोहली 4, सूर्यकुमार यादव 0 व शुभमन गिल 20 हे ठरावीक अंतराने बाद झाले व संघाची स्थिती 4 बाद 39 अशी अत्यंत निराशाजनक बनली होती.
यावेळी राहुल एकाकी लढत देत होता. त्याच्या साथीला कर्णधार हार्दिक पंड्या खेळपट्टीवर आला व या जोडीने संघाचे अर्धशतक फलकावर लावले. स्थिरावलेला असतानाही पंड्याने अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. तो 31 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 25 धावांवर बाद झाला व संघाचा डाव पुन्हा एकदा संकटात सापडला. यावेळी संघाची संपूर्ण मदार राहुल व रवींद्र जडेजा यांच्यावरच होती व त्यांनाही पुढे एकही नुकसान होऊ न देता संघाचा विजय साकार केला.
या जोडीने आधी संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर एकेरी व दुहेरी धावांवर भर देत खराब चेंडूंचा पुरेपुर लाभ घेत चौकार व षटकारही वसूल केले व संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या राहुलने या सामन्यात मात्र, संघाची गरज ओळखून संयमी फलंदाजी केली. त्याने आपले अर्धशतक साकार करताना संघाचा विजय दृष्टिपथात आणला.
गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांच्यात कमालीची अफलातून कामगिरी केलेल्या जडेजाने राहुलला सुरेख साथ देत जिद्दी खेळी केली. त्याने 69 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली. राहुलने आपल्या नाबाद 75 धावांच्या खेळीत 91 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 108 धावांची अखंडीत भागादीरी केली व संघाला एक अविश्वसनिय विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, भारतीय संघाचा बदली कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ट्रॅव्हीस हेडला महंमद सिरादने 5 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र, त्यानंतर मिशेल मार्शने वादळी फलंदाजी केली. त्याने अवध्या 65 चेंडूत 10 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत 81 धावांची खेळी केली. यावेळी ऑस्ट्रेलिया साडेतीनशे धावांची मजल मारेल असेच चित्र दिसत होते. मात्र, मार्श बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव घसरला. सिराज, महंमद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा व कर्णधार पंड्या यांनी त्यांच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केले व त्यांचा डाव 36 व्या षटकांत अवघ्या 188 धावांवर गुंडाळला.
मार्शने कर्णधार स्टीव्ह स्मिथसह डाव सावरताना आक्रमक फलंदाजी केली. स्मिथ 22 तर मार्नस लेबुशेन 15 धावांवर बाद झाले व त्यांच्या फलंदाजांवरील दडपण वाढले. जोश इंग्लिसने 27 चेंडूत 26 धावा करताना 1 चौकार व 1 षटकार फटवात थोडी चमक दाखवली मात्र, शमीच्या रिव्हर्स स्विंगवर तो तंबूत परतला. पाठोपाठ शमीने कॅमेरुन ग्रीनचाही अडसर दूर केला. त्यानंतर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सर्वात धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्यासह अष्टपैलु मार्कस स्टोनिस, सिन अबॉट यांनी साफ निराशा केली. भारताकडून शमी व सिराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. जडेजाने 2 बळी घेतले. पंड्या व यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
जडेजाचा सुपर झेल
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने मार्नस लेबुशेनचा अप्रतिम झेल घेतला. पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने सुर मारत एकाच हातात घेतलेल्या या झेलावर लेबुशेनही अवाक झाला होता.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया – 35.4 षटकांत सर्वबाद 188 धावा. (मिशेल मार्श 81, जोश इंग्लिस 26, स्टीव्ह स्मिथ 22, महंमद शमी 3-17, महंमद सिराज 3-29, रवींद्र जडेजा 2-46, हार्दिक पंड्या 1-29, कुलदीप यादव 1-48). भारत – 39.5 षटकांत 5 बाद 191 धावा. (शुभमन गिल 20, हार्दीक पंड्या 25, लोकेश राहुल नाबाद 75, रवींद्र जडेजा नाबाद 45, मिचेल स्टार्क 3-49, मार्कस स्टोनिस 2-27).