पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागातील उद्योग सुरु करण्याबाबत राज्याच्या उद्योग खात्याच्या सचिवांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला चार दिवसांत परवनागी मिळेल. त्यानंतर लगेचच शहरातील कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागातील उद्योगांना परवानगी देऊ असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, विरोधी पक्षनेते नाना काटे, उद्योजक विनोद बन्सल, बालाजी अय्यर यांनी शनिवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग सुरु करण्यासंबधी चर्चा केली. त्यावेळी येत्या आठ दिवसांत नॉन कन्टेन्मेंट झोन मधील उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली जाईल असे त्यांनी सांगतिले.

उद्योग सुरु करण्यासाठी स्वतंत्र ऍप व पोर्टल तयार करुन त्यावर अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात येतणार आहे. उद्योग सुरु केल्यानंतर सर्व नियम व अटींचे पालन उद्योजकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.

बेलसरे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यांशी पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग सुरु करण्यासंबधी लघु उद्योजकांच्या वतीने चर्चा केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी उद्योग सचिव भूषण गगराणी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना त्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यासंबधी पुणे येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील नॉन कन्टेन्मेंट झोन मधील उद्योग त्वरित चालू करण्यासंबंधी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त हर्डीकर यांनी राज्याचे उद्योग सचिव भूषण गगराणी यांना पिंपरी चिंचवड परिसरातील नॉन कन्टेन्मेंट झोनमधील उद्योग सुरु करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. त्याला येत्या 12 तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळेल असे आयुक्तांनी कळविले आहे.