पुसेगाव, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४- २५ कार्यक्रमाअंतर्गत फळपिकांना मातीद्वारे खते देण्याचे प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुरज घनवट यांच्या आंबा बागेमध्ये हे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकास लागणारी खते युरिया (नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट (स्फुरद), म्यूरेट ऑफ पोटॅश(पालाश) यातील रासायनिक घटकांची माहिती कृषीदूतांनी शेतकऱ्यांना दिली. खते पिकाला देण्याची शास्त्रीय पद्धत शेतकऱ्यांना सविस्तर सांगितली. या रसायनासोबत त्यांनी शेणखताचाही वापर केला. आंबा फलोत्पादनासाठी लागणारा एनपीके (२०० ग्राम नत्र, २०० ग्राम स्फुरद, ३०० ग्राम पालाश +१० किलो शेणखत) प्रती झाड प्रती वर्ष (एक वर्ष वयाच्या झाडांसाठी) हा डोस ही शेतकऱ्यांना सांगितला. नत्र पानातील हरितद्रव्यांचा महत्त्वाचा घटक असून ते झाडाच्या प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. तसेच स्फुरद हे मुळांचे चांगल्या वाढीसाठी व पालाश हे फळाची निरोगी वाढ, फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त आहे, हे शेतकऱ्यांना पटवून दिले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वय प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. नितिशा पंडित तसेच प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत अथर्व देवकर, यश निकम, रोहन बारबोले, पुष्कर बिसेन, सत्यजित धायगुडे, सुयोग भोसले व साहिल भोसले यांनी हा उपक्रम पार पडला.