Indrayani River – कामशेत-नायगाव परिसरातील इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरल्याने नदीचा संपूर्ण पट्टा हिरवागार दिसत असला, तरी प्रत्यक्षात ही परिस्थिती पर्यावरण आणि शेतीसाठी गंभीर संकट निर्माण करणारी ठरत आहे. नदीच्या पृष्ठभागावर पसरलेल्या जलपर्णीमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, धरण परिसरातून वाहत येणाऱ्या पाण्यासह जलपर्णी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात साचत आहे. कामशेत शहरापासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीचे पाणी पूर्णपणे झाकले गेले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह मंदावल्याने गाळ साचण्याचे प्रमाण वाढत आहे. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जलचरांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ अशीच परिस्थिती राहिल्यास नदीतील जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. या समस्येचा थेट परिणाम शेतीवर देखील होत आहे. नदीकाठावर बसवलेल्या पाण्याच्या मोटारी जलपर्णीमुळे झाकल्या गेल्या आहेत. इंद्रायणी नदीत जलपर्णीचा विळखा. त्यामुळे पाणी उपसा करणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज अधिक असताना ही अडचण शेतकऱ्यांसाठी गंभीर ठरत आहे. याशिवाय जलपर्णीमुळे पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याचेही निदर्शनास येत आहे. साचलेल्या वनस्पतीमुळे पाणी दूषित होत असून त्याचा परिणाम शेतीसह दैनंदिन वापरावरही होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. जलपर्णी काढण्यासाठी यांत्रिक आणि मानवी संसाधनांचा वापर करून मोहीम राबवणे, तसेच भविष्यात जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे गरजेचे ठरत आहे. पावसाळ्यात पुरस्थितीची भिती सध्या राज्यभर अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून पुढील काही महिन्यांत मान्सून आगमनाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेली असल्यास पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी नदीला पूर येण्याची शक्यता वाढते, तसेच आसपासच्या भागात पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. नदीच्या पात्रात इतकी जलपर्णी पसरली आहे की, पाण्याच्या मोटारी पूर्णपणे झाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा उपसा करण्यासाठी अडचणी येत आहेत. सोबतच नदीचे पाणीही दूषित होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही नदी स्वच्छ करणे आवश्यक आहे. – महेश चौधरी, शेतकरी, नायगाव