Indrayani River Pollution : इंद्रायणी की गटारगंगा? मोई ग्रामस्थ आक्रमक; आयुक्तांच्या दालनात दिला ‘हा’ इशारा
Indrayani River Pollution : तळवडे, चिखली आणि मोशीचे मैलामिश्रित पाणी थेट पात्रात; मोई ग्रामस्थांचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन.

Indrayani River Pollution – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वाढत्या प्रदूषणाविरोधात मोई (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे, चिखली आणि मोशी भागातून मोठ्या प्रमाणात मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. याचा मोठा फटका मोई आणि चिंबळी परिसरातील शेतीला बसत आहे. या भागातील विहिरी, कूपनलिका आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे स्रोत दूषित झाले असून इंद्रायणी नदीत जलपर्णीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्वही संकटात सापडले असून, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या या दयनीय अवस्थेकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.याप्रसंगी सरपंच शिला रोकडे, उपसरपंच सोमनाथ गवारी, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, सारिखा करपे, आरती फलके, पोलीस पाटील निखिल रोकडे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कायमस्वरूपी उपाययोजनांचे आश्वासन
नदी प्रदूषण गंभीर प्रश्नी आयुक्तांनी तातडीने लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे मोईचे उपसरपंच सोमनाथ गवारी यांनी सांगितले.





