Indrayani River : माऊलींच्या चरणी महाआरती, पण प्रदूषणाचे काय? आता सरकार उचलणार ‘हे’ कठोर पाऊल
Indrayani River : विजया एकादशीला महाआरतीचा जागर; नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत जलपूजन, मात्र सांडपाणी प्रक्रियेतील घोटाळ्यांवर ओढले ताशेरे.

Indrayani River – पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विजया एकादशीच्या मुहूर्तावर नयनरम्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात जलपूजन व दीपोत्सव करून प्रदूषणाविरोधात हा जागर करण्यात आला. याप्रसंगी आळंदी नगरपरिषद, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नदी प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, इंद्रायणीला फेस येत असल्याच्या बातम्या अनेक वर्षे ऐकायला मिळत आहेत. आम्ही जलप्रदूषणासंदर्भात सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला, पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवगंत उपुख्यमंत्री अजित पवार या सर्वांनी माऊलींना नेहेमी मनोभावे प्रार्थना केली आहे. त्यांचे प्रदूषणावर लक्ष असून बरचसे प्रश्न सुटू शकतात.
एमआयडीसीचे अनेक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कागदोपत्री सुरू दिसतात, पण प्रत्यक्षात ते बंद असतात. केवळ १० ते २० टक्के पाण्यावर प्रक्रिया होते, बाकी घातक रसायने थेट नदीत सोडली जातात. जे कारखाने वारंवार सूचना देऊनही प्रदूषण थांबवणार नाहीत, त्यांची नावे जाहीर करून त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले जाईल. तरीही सुधारणा न झाल्यास सरकार कठोर पावले उचलेल.
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश मसे यांनी नदी संवर्धन उपाययोजना आणि त्यासाठी उपलब्ध निधीबाबत माहिती दिली. नीलम गोऱ्हे यांनी महाबळेश्वर येथील हॉटेलच्या सांडपाणी प्रश्नाचे उदाहरण देत, सरकार आणि जनता यांच्यातील समन्वयातून इंद्रायणीचा प्रश्नही मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पालिकेने आणि देवस्थानने नदी स्वच्छतेसाठी व्यापक ‘सह्यांची मोहीम’ सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी देवस्थान विश्वस्त, आळंदी नगरपरिषद अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ, वारकरी संस्थेतील विद्यार्थी व बहुसंख्येने भाविक उपस्थित होते.
सुरक्षेसाठी ‘इंद्रायणी रक्षक’ तैनात होणार
देवस्थानच्या विश्वस्त रोहिणी पवार यांनी इंद्रायणी नदी महाआरतीचा उद्देश, नदी संवर्धन याबाबत माहिती दिली. नदी प्रदूषित होऊ नये आणि नदीकाठावर लक्ष राहावे, यासाठी देवस्थानच्या वतीने ६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी नदीकाठच्या गावांचे मैलामिश्रीत पाणी आणि एमआयडीसीचे रासायनिक सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी विधान परिषदेत आवाज उठवण्याची विनंती केली. जेणेकरून भाविकांना आचमनासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होईल.






