निसर्गाचा सुंदर आविष्कार इंद्रवज्र

शिरूर (प्रतिनिधी) – क्षितिजालगत आकाशी उमटणाऱ्या सात रंगांचे ते कवित्व तसे साऱ्यांच्याच हृदयीचे! पण हेच अर्धवर्तुळाकार इंद्रधनू पूर्ण, गोलाकार, वर्तुळात दिसले तर..! पदार्थविज्ञान शास्त्राला दुर्मिळ असणाऱ्या या देखाव्याने शिरूर तालुक्याला नुकतेच दर्शन घडवले आणि प्रत्यक्षदर्शींनी त्याला कायमचे हृदयस्थ केले. ही गोष्ट आहे “इंद्रवज्र’ची! निसर्गाचा एक दुर्मिळ आविष्कार!
इंद्रवज्रचे (गोलाकार इंद्रधन्युष्य) वैशिष्ट्यच असे असते की, जो हे दृश्य पाहातो तो स्वत:चे प्रतिबिंब हे इंद्रवज्रात पाहातो. हे इंद्रवज्र पाहणाऱ्यांच्या सावल्या या मध्यभागी आपल्याला बघायला मिळतात. मध्यभागात अत्यंत रंगीबेरंगी आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार “इंद्रधनुष्याचे’ सप्तरंगी तेजोवलय कडेला जाताना मात्र फिकट होत जाते. “इंद्रवज्र’ म्हणजे एक भौगोलिक दृष्ट्या नैसर्गिक नवलच आहे. इंद्रवज्रसाठी भौगोलिक परिस्थिती देखील तशी असायला हवी. इंद्रवज्रसाठी नासिर्गिक परिस्थिती कशी हवी हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडणार; परंतु त्यामागचे शास्त्रीय कारण आहे. अद्भूत दृश्य पाहताना निसर्गवेडे आनंदाने अक्षरशः बेभान होतात. बऱ्याचदा आपण हे दृश्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय की नाही याचा विश्वास देखील इंद्रवज्र पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीच्या डोळ्यांना बसत नाही.
इंद्रवज्रसाठी हा योग गरजेचा
इंद्रवज्रासाठी दिवस पावसाळ्याचे असावेत किंवा पावसाळ्यापूर्वीचे थोडेसे किंवा नंतरचे वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडणे गरजेचे आणि सह्याद्रीच्या डोंगरकड्यांमध्ये पश्चिमेकडे कोकणात उतरलेल्या रांगांवर पश्चिम दिशेकडून दाट धुके असलेले ढग पसरलेले असावेत. उगवत्या तेजाच्या भास्कराची सुंदर कोवळी किरणे त्या ढगांच्या पांढऱ्या गालिच्यावर पडली की, पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार “इंद्रधनुष्य’ समोरच्या दरीतून येणाऱ्या ढगांवर दिसू लागते.
परिघ तसा आटोपशीरच
नेहमीच्या इंद्रधनुष्याच्या तुलनेत “इंद्रवज्र’ परिघ तसा आटोपशीर. ढगांच्या त्या पुंजक्यावर उमटेल एवढाच; पण मधोमध उमटणारी प्रतिमा आणि भोवतीची रंगांची प्रभावळ वेगळ्याच जगात घेऊन जाते. या “इंद्रवज्र’ची आपल्याकडची पहिली नोंद कर्नल साइक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1835 रोजी कोकणकड्यावरच केली होती. वर्तुळाकार इंद्रधनुष्य आणि या प्रतिमांनी सुरुवातीला सारेच चक्रावले. एका निसर्ग नवलाईची ही पहिली नोंद! त्यानंतर दुर्मिळ वेळाच हे इंद्रवज्र दिसले असून त्याचा योग सोमवारी (दि. 15) शिरूरकरांना आला होता असेच म्हणावे लागेल.





