#Accident : ब्रेक फेल झाल्याने बस दरीत कोसळून 27 जणांचा मृत्यू, 39 जखमी

जकार्ता – इंडोनेशियतील जावा बेटावर एक प्रवासी बस खोल दरीत कोसळून काल संध्याकाळी झालेल्या अपघातात किमान 27 जण ठार झाले. तर 39 जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे पोलीस आणि बचाव पथकातील सदस्यांनी सांगितले.
या बसमध्ये इस्लामिक कनिष्ठ हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा एक गट होता आणि हे सर्वजण पश्चिम जावा प्रांतातील सुबंग शहरातील होते, असे स्थानिक पोलिस प्रमुख एको प्रसेत्यो रोबियान्टो म्हणाले.
बस प्रांताच्या तासिकमलय जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रातून सुबंगकडे परत जात होती, सुमेदांग जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र उतार असल्याने ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 20 मीटर खोल ओढ्यात पडली. पोलिस अद्यापही अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत. मात्र बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे हा अपघात झाला, असे अपघातात बचावलेल्यांनी सांगितले. 27 मृतदेह आणि 39 जखमी लोकांना रुग्णालयात आणि जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.
सुरक्षाविषयक आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे इंडोनेशियामध्ये रस्ते अपघात नेहमीच होत असतात. डिसेंबर 2019 मध्ये सुमात्रा बेटावर प्रवासी बस 80 मीटर खोल ओढ्यात पडली आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगाने वाहणाऱ्या नदीत कोसळल्याने 35 लोक ठार झाले होते.





