नवी दिल्ली – भारत आणि रशिया दरम्यान “एअर बबल’ करारांतर्गत शुक्रवारपासून विमानसेवेला सुरुवात होणार आहे. रशियाच्या दूतावासाने याबाबतची माहिती दिली. या करारानुसार काही निर्बंधांसह दोन्ही देशांदरम्यानची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र अजूनही रशियातील पर्यटकांना अजूनही भारतात प्रवेश मिळू शकणार नाही, असे रशियाच्या दूतावासाने म्हटले आहे. करोनाच्या साथीमुळे भारत आणि रशियादरम्यानची आंतरराष्ट्रीय विमानसेवा गेल्या वर्षी 23 मार्च पासून स्थगित होती. मात्र गेल्या वर्षी जुलैपासून एअर बबल सुविधेंतर्गत विशेष विमानांना परवानगी दिली गेली होती. उद्यापासून सुरू होणाऱ्या एअर बबल अंतर्गत तीन प्रकारच्या प्रवाशांना भारत ते रशिया प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. भारतात अडकून राहिलेले रशियाचे नागरिक, रशियाचा व्हिसा असलेले भारतीय, नेपाळी अथवा भुतानचे नागरिक आणि रशियामध्ये कामाचे नियोजन असलेले खलाशी यांना भारतातून रशियात जाण्याची परवानगी असेल. तर रशियातून भारतात येण्यासाठी रशियात अडकलेले भारतीय, नेपाळी आणि भुतानचे नागरिक, भारताचे परदेशी नागरिकत्व कार्ड धारक आणि मूळ भारतीय वंशाचे आणि कोणत्याही देशाचा पासपोर्टधारक नागरिक, रशियातील खलाशी आणि पर्यटनाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी भारतात येऊ इच्छिणारे रशियाचे नागरिक यांना परवानगी असेल. भारताने गेल्यावर्षी जुलैपासून अमेरिका, युएई, बहरीन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, केनिया, भूतान, अफगाणिस्तान, इराक आणि जपानसह 24 देशांबरोबर एअर बबल अंतर्गत विमान सेवा राबवली आहे.