नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “मोदीजी लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष पंतप्रधान आहेत. ते जिथे हात लावतात, तिथे सोने होते. मोदी आहे तर मुमकीन आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी मोदींच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. या सोहळ्यातून त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अप्रत्यक्षपणे शुभारंभही केला. महायुतीचा विजय निश्चित – शिंदे यांनी भाषणात आगामी निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. “विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच निवडणुकीत विजयी होईल, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही,” असे सांगत त्यांनी महायुतीच्या यशाचा दावा केला. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करताना, “ते स्थगिती सरकार होते. प्रकल्पांच्या फाइल्स थांबल्या होत्या, निर्णय पुढे ढकलले जात होते,” असा टोला लगावला. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे आज विकासाला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नवी मुंबई विमानतळ: नव्या भारताचे प्रतीक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरवत शिंदे म्हणाले, “आठ वर्षांपूर्वी मोदीजींच्या हस्ते या ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमिपूजन झाले आणि आज त्यांच्याच हस्ते उद्घाटन होत आहे. हा फक्त प्रकल्प नाही, तर नव्या भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे.” हे विमानतळ महाराष्ट्राच्या आर्थिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्राला नवे पंख देणार असल्याचा दावा त्यांनी केला. “मोदीजींच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात महामार्ग, बंदरे, मेट्रो प्रकल्प आणि औद्योगिक कॉरिडॉर यांची गती वाढली आहे. नवी मुंबई विमानतळ हा त्याच प्रगतीचा नवा टप्पा आहे,” असेही ते म्हणाले. महायुतीने दिला विकासाला वेग – शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. “देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अनेक विकास प्रकल्पांना सुरुवात केली. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्पांना खीळ बसली. २०२२ मध्ये महायुती सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर स्थगिती सरकार हटवले आणि विकासाला दुप्पट वेग दिला,” असा दावा त्यांनी केला. “मुंबईत एका टोकापासून दुसऱ्या टोकाला केवळ एका तासात पोहोचण्याचे स्वप्न महायुतीच पूर्ण करू शकते. देशातील सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत,” असेही त्यांनी ठासून सांगितले. शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज – शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. “राज्याचा विकास होत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, हा शब्द आम्ही पाळला,” असे ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने महाराष्ट्राला पाचपट जास्त निधी दिला आहे. ही मदत कायमस्वरूपी राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांना टोला – विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, “काही नेते शेतकऱ्यांना काय मिळाले, असा प्रश्न विचारतात. पण त्यांना आकडेवारीची जाणीवच नाही. शेतकऱ्यांना मात्र सर्वकाही माहीत आहे.” या भाषणातून शिंदे यांनी विकास आणि शेतकरी कल्याणाच्या मुद्द्यावर महायुतीच्या कामगिरीचे कौतुक करत निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली.