“इंदिरा गांधींनी 1970 सालीच आपली संपत्ती देशाला दान केली” – भुपेश बघेल

राजनांदगाव (छत्तीसगड) – इंदिरा गांधी ( Indira Gandhi )यांनी १९७० मध्ये आपली वारसा हक्कातून मिळालेली संपत्ती देशाला दान केली. अलाहाबाद येथील वडिलोपार्जित घरही त्यांनी देशाला दान केले. असे असताना त्यांच्या संबंधात खोटे आरेाप करून पंतप्रधान मोदींनी आपल्या लबाडीच्या राजकारणाचे देशाला पुन्हा दर्शन घडवले आहे, अशी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस या देशात वारसा हक्कातून मिळणाऱ्या संपत्तीवर कर लादणार आहे, ती संपत्ती हिराऊन घेऊन ती मुसलमानांना वितरीत करणार आहे असे विधान केले होते. त्यावर चौफेर टीका झाली.
वास्तविक राजीव गांधी यांच्या सरकारनेच १९८५ मध्ये वारसा मालमत्तेवरील कर रद्द केला होता ही बाबही समोर आली. त्यावेळी मोदींनी घुमजाव करीत राजीव गांधी यांनी त्यांना इंदिरा गांधींकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीवर कर भरावा लागू नये म्हणून हा वारसा कर रद्द केला. पण आता कॉंग्रेस हा कर पुन्हा लागू करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप केला होता. त्याचा समाचार घेताना बघेल म्हणाले की इंदिरा गांधींनी सन १९७० मध्येच आपली मालमत्ता देशाला अर्पण केली होती. या इतिहासाची मोदींना माहिती नाही. असे कोणतेही आरोप करताना मोदींनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे असेही नमूद केले.
एएनआयशी बोलताना बघेल म्हणाले, “पीएम मोदी हे खोटे बोलणारे आहेत. त्यांना इतिहास किंवा नियमांचे ज्ञान नाही. त्यांनी 10 वर्षात घोषणाबाजी करण्याशिवाय काहीही केले नाही आणि ते त्यांच्या कामगिरीच्या आधारे मते मिळवू शकत नसल्यामुळे मोदी अशी दिशाभुल करणारी विधाने करीत आहेत असे बघेल म्हणाले.





