नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो (IndiGo) ची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (InterGlobe Aviation Ltd) अडचणीत आली आहे. सरकारने कंपनीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ₹58.74 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (GST) दंड ठोठावला आहे. दिल्ली साउथच्या CGST (केंद्रीय GST) अधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे, अशी माहिती कंपनीने 12 डिसेंबर रोजी शेअर बाजाराला दिली. कंपनीकडून दंडाला आव्हान – इंटरग्लोब एव्हिएशनने मात्र हा दंड पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे या निर्णयाविरुद्ध मजबूत पुरावे आणि तज्ज्ञांचा सल्ला आहे. त्यामुळे कंपनी आता या निर्णयाला योग्य प्राधिकरणाकडे अपील (वरिष्ठ कोर्टात आव्हान) करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या दंडाचा कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर किंवा विमानसेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरणही कंपनीने दिले आहे. वाढत्या विमान रद्द प्रकरणांमुळे DGCAची कडक भूमिका – एकीकडे हा दंडाचा विषय असताना, दुसरीकडे इंडिगोच्या विमानसेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने हवाई वाहतूक नियंत्रक संस्था DGCA (नागरिक विमान वाहतूक महासंचालनालय) ने कठोर भूमिका घेतली आहे. 11 डिसेंबर रोजी DGCA चे अधिकारी थेट इंडिगोच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी कंपनीच्या कामकाजाची कसून तपासणी केली. इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स यांना DGCA ने स्थापन केलेल्या चौकशी समितीसमोर हजर व्हावे लागले. त्यांना वारंवार विमाने रद्द का झाली आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यांना पुन्हा शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. नागर विमानन मंत्रालयाने इंडिगोला त्यांच्या हिवाळ्यातील वेळापत्रकात 10 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. सहसा इंडिगो दररोज सुमारे 2,300 विमाने चालवते, पण सध्या ती सुमारे 1,950 उड्डाणे करत आहे. चौकशीसाठी चार सदस्यीय समिती – DGCA ने विमानसेवा विस्कळीत होण्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी एक चार सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये संयुक्त महानिदेशक संजय ब्रह्माणे, उप महानिदेशक अमित गुप्ता, वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर कपिल मंगलीक आणि लोकेश रामपाल यांचा समावेश आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल सादर करेल. दरम्यान, एकाच वेळी GST दंड आणि DGCAच्या वाढत्या तपासणीमुळे इंडिगोची मूळ कंपनी सध्या दुहेरी संकटात सापडली आहे.