इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका; पोस्ट शेअर करत म्हणाले “ही अपेक्षा नव्हती, यापुढे…”

Amol Kolhe : इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या मोठ्या गोंधळामुळे पुणे विमानतळावर विमानसेवा पूर्णपणे विस्कळित झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे विमानतळावरून इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला आहे. या गोंधळाचा फटका खासदार डॅा. अमोल कोल्हे यांना देखील बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट लिहित याबाबत नाराजी व्यक्त करत यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन थेट केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. इंडिगोचा हा गोंधळ हे या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचे परिणाम आहेत. पुन्हा एकदा, विलंब, विमानाचे वेळापत्रक रद्द होणे आणि हतबलता याचे परिणाम सामान्य भारतीयांना भोगावे लागत आहेत, असल्याचे खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत.
दरम्यान, पुणे विमानतळावरील इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय.. इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती…यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय, अशी पोस्ट खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
View this post on Instagram
कारण काय?
देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी म्हणून इंडिगोची ओळख आहे. विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. इंडिगोची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी देखील विस्कळीत आहे, त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरूवारी दिवसभरात दिल्ली, मुंबई, बंगळुरूसह देशातील अन्य विमानतळांवरून 550 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. या गोंधळाचे मूळ कारण विमानतळ प्रशासनाच्या कमी क्षमतेपेक्षा इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Dia Mirza: भारतातील प्रदूषणावर दीया मिर्झाचा गंभीर इशारा : ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात’





