Dia Mirza: ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायर्नमेंटल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी दीया मिर्झा तसेच दिग्दर्शिका जोया अख्तर यांनी हजेरी लावली. पर्यावरण संरक्षण, हवामान बदल आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोघांनीही स्पष्टपणे आपली मते व्यक्त केली. ‘कथाकथन हे पर्यावरण जागरूकतेचे प्रभावी माध्यम’ – दीया मिर्झा दीया मिर्झा म्हणाल्या की, हा फेस्टिव्हल केवळ वन्यजीवांवरील माहितीपटच सादर करत नाही; तर सामान्य माणसांच्या जीवनावर आणि पर्यावरणाशी संबंधित गुंतागुंतीच्या प्रश्नांवर आधारित कथा देखील लोकांसमोर आणतो. त्यांच्या मते, कथाकथन हे पर्यावरणविषयक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सर्वात ताकदवान साधन आहे. त्यांच्या निर्मिती संस्थेची एक मराठी फिल्मही या फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाली आहे, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. वायूप्रदूषणावर तीक्ष्ण सवाल दीया मिर्झा गेल्या अनेक वर्षांपासून वायूप्रदूषणाचा विषय अभ्यासत आहेत. यावेळी त्यांनी एक धक्कादायक विधान करत चिंता व्यक्त केली. “जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात आहेत. आपण फक्त दिल्ली आणि मुंबईचीच चर्चा करतो; पण देशात आणखी अनेक शहरे अत्यंत प्रदूषित आहेत.” त्यांनी सांगितले की, पूर्वी जेव्हा त्या हा विषय मांडायच्या तेव्हा फारसे लोक बोलत नसत; पण आता परिस्थिती गंभीर पातळीवर पोहोचली आहे. त्यांच्या कथा आणि चित्रपट लोकांच्या आयुष्यात बदल घडवावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. ‘चित्रपट हे सर्वात प्रभावी माध्यम’ – जोया अख्तर दिग्दर्शिका जोया अख्तर यांनी फेस्टिव्हलचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यातून आपण संदेश पोहोचवू शकलो, तर आगामी पिढ्यांसाठी आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी आपण चांगले काम करू शकतो.” जोयाने सांगितले की, त्यांच्या एका चित्रपटात एका व्यक्तीने संपूर्ण भारतीय किनारपट्टी पायी चालून समुद्री कासवांसह इतर जलचर-वन्यजीवांचे दस्तावेजीकरण कसे केले, याची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली आहे. वैयक्तिक प्रयत्नही पर्यावरण संरक्षणात मोठा बदल घडवू शकतात, हा संदेश त्यातून दिला आहे. फेस्टिव्हलचा उद्देश दीया मिर्झा यांनी मागील वर्षी फेस्टिव्हलच्या ज्यूरी सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभवही शेअर केला. त्यांच्या मते, ज्यूरीचे काम कठीण असले तरी सामाजिक न्याय, पर्यावरण आणि पृथ्वीशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेण्यासाठी चित्रपट अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.