आळेफाटा : देशभरात गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना ग्रामीण भागाने मात्र या संकटावर शाश्वत आणि ‘देशी’ उपाय शोधत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. आळेफाटा परिसरात वाढत्या प्रमाणात उभारले जात असलेले गोबरगॅस (बायोगॅस) प्रकल्प हे याचे ज्वलंत उदाहरण ठरत असून, इंधनासोबतच सेंद्रिय खताचा दुहेरी फायदा शेतकर्यांना मिळत आहे. शहरांमध्ये गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागत असताना, आळेफाटा परिसरातील अनेक शेतकरी घरातील शेण व सेंद्रिय कचर्यापासूनच दररोज गॅस तयार करून स्वयंपाक आणि पाणी तापवण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे एलपीजीवरील खर्चात मोठी बचत होत असून शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. या प्रकल्पामध्ये शेण व सेंद्रिय कचर्याचे ऑक्सिजनविना विघटन (अॅनारोबिक प्रक्रिया) होऊन मिथेनयुक्त ज्वलनशील वायू तयार होतो. या गॅसमध्ये सुमारे 55 ते 60 टक्के मिथेन व 40 ते 45 टक्के कार्बन डायऑक्साइड असते, जो घरगुती वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. परिसरातील काही प्रकल्पांमध्ये दररोज सुमारे 30 किलो शेण व घरातील उरलेले अन्न वापरून सातत्याने गॅस निर्मिती केली जाते. या प्रक्रियेतून तयार होणारी स्लरी ही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त सेंद्रिय खत म्हणून शेतीसाठी वापरली जात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे आळेफाटा परिसरातील एक गोबरगॅस प्रकल्प गेली 15 वर्षे यशस्वीपणे कार्यरत असून, त्यातून 9 सदस्यांच्या कुटुंबाचा रोजचा स्वयंपाक आणि पाणी तापवण्याची गरज पूर्ण होते. त्यामुळे गॅस सिलिंडरवरील अवलंबित्व जवळपास संपुष्टात आले आहे. या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित होत असून नव्याने गोबरगॅस युनिट उभारण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, गोबरगॅस प्रकल्पासाठी योग्य क्षमतेचा डायजेस्टर, गळतीमुक्त यंत्रणा आणि गॅस साठवणुकीची व्यवस्थित सुविधा असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी साठवणुकीअभावी तयार होणारा गॅस वाया जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. एकंदरीत, वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरातील हा ‘देशी’ उपाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि पर्यावरणपूरक ठरत असून, इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. गोबरगॅसचे फायदे घरच्या घरी इंधननिर्मिती; एलपीजीवरील खर्चात बचत सेंद्रिय कचर्याचा प्रभावी वापर उच्च प्रतीचे सेंद्रिय खत उपलब्ध पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा शेतकर्यांच्या स्वयंपूर्णतेला चालना चौकट : यशस्वी प्रयोग ठरतोय आदर्श 15 वर्षांपासून सुरू असलेला प्रकल्प 9 सदस्यांच्या कुटुंबाचा गॅसपुरवठा पूर्ण दररोज 30 किलो शेणाचा वापर गॅससोबत शेतीसाठी दर्जेदार खत निर्मिती हेही वाचा : Pune District : चाकणमध्ये गॅस टंचाईचा ‘स्फोट’ ; पुणे-नाशिक महामार्ग रोखत नागरिकांचा संताप उसळला