मुंबई – भारत सरकार आणि रिझर्व बँक परकीय चलन संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून विविध देशाबरोबर भारत भारताच्या किंवा संबंधित देशाच्या चलनातून आयात निर्यातीचे व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे. रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार भारत आणि मालदीव दरम्यानचा व्यापार भारतीय रुपया किंवा मालदीवच्या एमव्हीआर या चलनाच्या माध्यमातून होऊ शकतो. त्याचबरोबर दक्षिण आशियातील देशांनी एशियन क्लिअरिंग युनियन सुरू केली आहे. या माध्यमातूनही दोन्ही देशाचा व्यापार होऊ शकणार आहे. एशियन क्लिअरिंग युनियनमध्ये भारताबरोबरच बांगलादेश, बेलारूस, भूतान, इराण, मालदीस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा समावेश आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील देशांना परस्परादरम्यान आर्थिक व्यवहार करण्यासाठी डॉलर किंवा युरोची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित देशाच्या परकीय चलनाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. भारत अशा प्रकारची यंत्रणा इतर अनेक देशाबरोबर राबविण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या व्यापार युद्ध सुरू असल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर विविध देशाच्या चलनाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.