भारताची साखर परदेशात झाली गोड! सोमालिया, श्रीलंका, अफगाणिस्तानला मोठा पुरवठा

नवी दिल्ली – भारताने 6 जून पर्यंत 5.16 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. सर्वात जास्त साखर सोमालीयाला निर्यात करण्यात आली असून या देशाला भारतीय निर्यातदाराकडून कडून 1.18 लाख टन इतकी साखर निर्यात करण्यात आली आहे.
ही माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन या संघटनेने जारी केली. या संघटनेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, 2024- 25 या वर्षांमध्ये भारत सरकारने 20 जानेवारी रोजी साखर निर्यातीला परवानगी दिली. सध्याच्या माहितीनुसार भारत सरकारने यावर्षी दहा लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी 5.16 लाख टन साखर अगोदरच निर्यात झाली आहे. नजीकच्या भविष्यात आणखी निर्यात होण्याची शक्यता आहे.
5.16 लाख टन साखर निर्यातीपैकी चार लाख टन साखर पांढरी आहे. 81 हजार टन साखर ही जास्त शुद्धीकरण केलेली आहे. तर 25,000 टन साखर कच्ची आहे.
सध्या विविध बंदराकडे 23 हजार टन साखर पाठविण्यात आली असून ही साखर निर्यात करण्यासंदर्भात कसलेही अडथळे अजून तरी आलेले नाहीत. सोमालीयाबरोबरच भारतीय निर्यातदारांनी श्रीलंकेला 76 हजार टन, अफगाणिस्तानला 72 हजार टन साखर निर्यात केली आहे.
प्राप्त माहितीनसार यावर्षी सरकारने दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली असली तरी किमान आठ लाख टन साखर निर्यात केली जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून साखर कारखानदारांनी निर्यातदार प्रयत्न करीत आहेत.
भारत देशातील गरज ध्यानात घेऊन वेळोवेळी साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेत असतो. भारतातील अन्नसुरक्षेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन हा निर्णय घेतला जात असल्याचे वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी नमूद केले.





