ICC T20I Rankings : हार्दिक पांड्या पुन्हा ठरला नंबर-1 All Rounder…! जाणून घ्या, टाॅप-10 अष्टपैलू खेळाडूंची नावे….

ICC Men’s T20I All-Rounder Rankings : भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आता जगातील नंबर-1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिक पांड्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं जाहीर केलेल्या ताज्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला पिछाडीवर टाकत हा टप्पा गाठला आहे.
A return to No.1 for one of India’s best in the latest T20I Rankings 👊https://t.co/NpVQN2k53C
— ICC (@ICC) November 20, 2024
माहितीसाठी, हार्दिक पांड्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदाच नंबर-1 अष्टपैलू खेळाडू बनला नाही. तर या फॉरमॅटच्या क्रमवारीत त्याने याआधीसुध्दा पहिले स्थान मिळवले आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या समाप्तीनंतर 3 जुलै 2024 रोजी जाहीर झालेल्या अष्टपैलू खेळाडूच्या क्रमावारीत देखील हार्दिकनं अव्वल स्थान मिळवले होते. त्यावेळी अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. हार्दिकनं T20 विश्वचषकामध्ये भारताला चॅम्पियन बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. टी-20 विश्वषकात पांड्याने 144 धावा आणि11 विकेट घेतल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तो टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. हार्दिक बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 352 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने यावर्षी 16 विकेट्सही घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात हार्दिकने शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात हार्दिकने तीन षटकात एका मेडनसह केवळ आठ धावा दिल्या आणि एक बळी घेतला होता.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत हार्दिक पंड्या 244 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी 230 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वी इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन अव्वल स्थानावर होता, मात्र आता तो दोन स्थानांनी खाली घसरला आहे. लिव्हिंगस्टोन आता 203 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस चौथ्या आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार वानिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर आहे. स्टॉइनिसला आणखी वर येण्याची संधी होती, पण पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो गोलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नाही. स्टॉइनिसने तिसऱ्या टी-20 मध्ये निश्चितच बॅटने खळबळ उडवून दिली मात्र ती पुरेशी नव्हती.
यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सहाव्या, तर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सातव्या स्थानावर आहे. यानंतर वेस्ट इंडिजचा रोमॅरियो शेफर्ड टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलूंच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 9व्या तर गेहार्ड इरास्मस 10व्या क्रमांकावर आहे.





