#AsiaCup2023 : भारतीय संघ जाहीर; बुमराह, राहुल, अय्यर, कुलदीपचे पुनरागमन तर चहलला वगळले..

मुंबई :- बीसीसीआयने सोमवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले असून पुर्ण तंदुरुस्त असूनही त्याबाबत साशंकता असल्याने लोकेश राहुलसाठी मात्र, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनला बॅकअप यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. संघात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, महंमद शमी व महंमद सिराज हे सर्व वरिष्ठ खेळाडू संघात परतले आहेत.
सूर्यकुमार यादवची एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी फारशी सरस झालेली नसली तरीही त्याला सॅमसनप्रमाणे आणखी एक संधी देण्यात आली असून प्रमुख गोलंदाजांना पर्याय म्हणून शार्दुल ठाकूर व प्रसिध कृष्णा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. कृष्णाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात पुनरागमन करताना चमकदार कामगिरी केल्याचा त्याला लाभ झाला आहे.
मुंबई इंडियन्सकडून तसेच वेस्ट इंडिज व आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत चमकलेल्या तिलक वर्माला संघात स्थान देण्यात आले असून त्याला अंतिम संघात संधी मिळाली तर तो पदार्पण करण्यासाठी सज्ज बनला आहे.
लक्षवेधी..
– आयर्लंडविरुद्धचे यश बुमराहला लाभले
– लेग स्पीनर चहलला वगळले
– ऋतुराज गायकवाडलाही डच्चू
– तिलक वर्माला आतिरिक्त फलंदाज म्हणून संधी
– अंतिम संघात निवड झाल्यास पदार्पण करणार
– संजू सॅमसनला आणखी एक संधी
– साशंक राहुलसाठी सॅमसनचा बॅकअप
– पंड्याकडे उपकर्णधारपद
– प्रसिध कृष्णाचाही समावेश
संघाचे उपकर्णधारपद अष्टपैलू हार्दिक पंड्याकडेच कायम ठेवण्यात आले असून लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलला डच्चू देताना डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत केलेली सातत्यपूर्ण कामगिरी त्याला लाभदायक ठरली आहे. वेगवान गोलंदाजीची बाजू संघात परतलेल्या शमीसह सिराज सांभाळणार असून फिरकीची मदार कुलदीपसह रवींद्र जडेजा आणि अक्सर पटेल यांच्यावर राहणार आहे.
बुमराहच्या तंदुरुस्तीमुळे चिंता मिटली
भारतीय संघातून तब्बल 11 महिने दुखापतीमुळे बाहेर असलेला प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधार म्हणून आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले. त्याने प्रत्येक सामन्यात सातत्याने बळी घेत तसेच ताशी 140 किलोमीटर वेगाने चेंडू टाकत आपण पूर्ण मॅचफिट असल्याचे सिद्ध केल्याने त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कर्णधार रोहितसह संघ व्यवस्थापनाचीही चिंता मिटली आहे.
भारतीय संघ पुुुढीलप्रमाणे :-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, महंमद शमी, महंमद सिराज, प्रसिध कृष्णा, संजू सॅमसन (राहुलसाठी बॅकअप यष्टीरक्षक).




